सार्कच्या बैठकीला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मंत्री उपस्थित राहिल्यामुळे पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगातील अधिकारी ही बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. हिंदुस्थान टाइम्सने इस्लामाबादलमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. इस्लामाबादमध्ये रविवारी सार्कची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची बैठक पार पाडली.

त्यावेळी पीओकेचे मंत्री चौधरी मोहम्मद सईद या बैठकीला हजर होते. आपला निषेध नोंदवण्यासाठी भारताचे राजनैतिक अधिकारी शुभम सिंह या बैठकीतून बाहेर पडले. संपूर्ण काश्मीरला भारत आपला अविभाज्य अंग मानतो. त्यामुळे पीओकेमधील कुठलेही सरकार किंवा मंत्र्याला भारताची मान्यता नाही. म्हणून शुभम सिंह या बैठकीतून बाहेर पडले.

२०१६ साली उरी येथील सैन्य तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानात होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेतून माघार घेतली होती. भारतापाठोपाठ बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी सुद्धा सार्कपरिषदेत सहभागी होणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध म्हणून या देशांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर एकही सार्कची बैठक झालेली नाही.

सप्टेंबर महिन्यातही संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये होणारी परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताने रद्द केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसाची क्रूर हत्या आणि दहशतवादी बुरहान वाणीचे उद्दातीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या कृतीचा निषेध म्हणून भारताने ही बैठक रद्द केली होती.