भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पाल्यांना इतरत्र व्यवस्था करण्याचे निर्देश

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकाधिक ताणले गेलेले असतानाच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील राजनैतिक अधिकारी  व इतरांनी आपल्या पाल्यांची यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पाकिस्तानबाहेर शिक्षणाची व्यवस्था करावी, असा सल्ला भारताने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तान हे योग्य ठिकाण नसल्याचेही भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांबाबत आणि राजनैतिक मोहिमेसंदर्भातील धोरणांचा आढावा घेतल्यानंतर त्याचप्रमाणे तेथील स्थितीची पाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कर्मचारी आणि राजनैतिक मोहिमेसंदर्भात आढावा घेतला जाणे ही नियमित प्रक्रिया आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे.

या  शैक्षणिक वर्षांपासून इस्लामाबादमधील भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तानबाहेर व्यवस्था करावी, असा सल्ला अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. भारतीय अधिकाऱ्यांची जवळपास ५० मुले सध्या पाकिस्तानात आहेत. भारताने अशा प्रकारच्या सूचना दिल्याने पाकिस्तान हे दर्जेदार शिक्षणासाठी योग्य ठिकाण नाही हे स्पष्ट होत आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वानी याला ठार केल्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जी वक्तव्ये केली, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकाधिक ताणले गेले आहेत. शरीफ यांनी दहशतवाद्यांची पाठराखण करत काश्मीरबाबत बेताल व्यक्तव्ये केली होती. त्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड वक्तव्ये करत पाकिस्तानला सुनावले होते.