भारतीय पदार्थाना एक वेगळीच लज्जत असते. रुचकर आणि लज्जतदार भारतीय पदार्थानी परदेशी नागरिकांनाही भुरळ पाडली आहे. त्याचमुळे युरोप-अमेरिकेतही भारतीय उपाहारगृह मोठय़ा प्रमाणात चालतात. लंडनमधील ‘मेफेअर’ या उपाहारगृहाला तर ब्रिटनमधील सवरेत्कृष्ट उपाहारगृहाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे हे एकमेव भारतीय उपाहारगृह आहे.
‘द क्लोव्ह क्लब’ आणि ‘द लेडबरी’ या ब्रिटनमधील प्रसिद्ध उपाहारगृहांनाही ‘मेफेअर’ने मागे टाकले आहे. या उपाहारगृहांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. भारतीय जिमखाना क्लबच्या वसाहतींसाठी सप्टेंबर २०१३मध्ये हे उपाहारगृह उघडण्यात आले. अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. केवळ भारतीयच नव्हे तर ब्रिटिश नागरिकांनाही या उपाहारगृहाने भुरळ घातली. खास भारतीय पदार्थ आणि ब्रिटिश पद्धतीचे आधुनिक पदार्थ या उपाहारगृहात मिळतात.
पारंपरिक भारतीय पदार्थाना ब्रिटनमध्ये खूपच मागणी आहे. या उपाहारगृहातील पदार्थ खरेच खूप रुचकर आहेत. त्यामुळेच येथे नेहमीच खवय्यांची गर्दी असते. हे उपाहारगृह या पुरस्काराला पात्र आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया ‘रेस्टॉरंट मॅगझिन’चे संपादक स्टीफन चोम्का, यांनी या पुरस्काराविषयी बोलताना व्यक्त केली.

काय आहे पुरस्कार?
‘रेस्टॉरंट मॅगझिन’च्या वतीने दरवर्षी ब्रिटनमधील अव्वल १०० उपाहारगृहांची यादी तयार केली जाते. त्यातील पहिल्या उपाहारगृहाला ‘राष्ट्रीय उपाहारगृह पुरस्कार’ दिला जातो. गेल्या सात वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात असून विविध शेफ, पदार्थ लेखक आणि तज्ज्ञांच्या पॅनलकडून उपाहारगृहांची निवड केली जाते. यंदा या पुरस्कारावर भारतीय पुरस्काराने मोहोर उमटवली.