01 March 2021

News Flash

भारतीय अर्थव्यवस्था जीएसटी, नोटाबंदीतून सावरली!

भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढते आहे.

| March 12, 2018 03:20 am

भारतीय अर्थव्यवस्था वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणी तसेच नोटाबंदीच्या अनिष्ट परिणामातून सावरत असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत

भारतीय अर्थव्यवस्था वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणी तसेच नोटाबंदीच्या अनिष्ट परिणामातून सावरत असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. मात्र शिक्षण, आरोग्य व बँकिंग कार्यक्षमता या क्षेत्रांत सुधारणा अपेक्षित असल्याचेही नमूद केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपव्यवस्थापकीय संचालक ताओ झांग यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढते आहे. त्याला कारण स्थूल आर्थिक धोरणातील बदल हे आहे. पुरवठय़ाच्या बाजूने असलेले अडथळे दूर झाले असून रचनात्मक सुधारणा राबवण्यात आल्या आहेत. वस्तू आणि सेवा कर तसेच नोटाबंदी यामुळे आर्थिक वाढ खुंटली होती, ती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अलीकडच्या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता, त्यामुळे भारताने पुन्हा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद परत मिळवले आहे असे म्हणायला हरकत नाही.

भारताच्या अर्थव्यवस्थेत रोजच्या व्यवहारात रोखीला मोठे स्थान आहे, त्यामुळे नोटाबंदीचे तात्पुरते वाईट परिणाम अपेक्षित होते, असे सांगून ते म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही गुंतागुंतीची असून त्याच्या अंमलबजावणीने काही काळ अर्थव्यवस्थेला फटका बसला. पण आता अर्थव्यवस्था त्यातूनही सावरत आहे. आता नवीन जीएसटीचा फायदाच होईल. भारताचा अर्थसंकल्प हा आयात शुल्क वाढवणारा म्हणजे संकुचित संरक्षणवादी असल्याची टीका होत आहे, त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, वाढीव आयात शुल्कामुळे उत्पादन, रोजगार व गुंतवणूक यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

आरोग्य, शिक्षण, खासगी व सार्वजनिक गुंतवणूक यात सुधारणा अपेक्षित असून बँकिंग व आर्थिक यंत्रणांची कार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसमावेशक व शाश्वत अशी आर्थिक वाढ भारताला गाठता येईल, तसेच श्रीमंत देशांची उत्पन्न पातळी मिळवता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 3:20 am

Web Title: indian economy back on track after after gst demonetisation
Next Stories
1 गोरखपूर, फुलपूरमध्ये मतदारांचा निरुत्साह
2 मुफ्ती वकास ठार झाल्याने ‘जैश’ला हादरा
3 पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गुजरातीच कसे? : पी. चिदंबरम
Just Now!
X