जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारत यंदाच्या वर्षी (२०१८) चीनलाही मागे टाकून पुढे जाणार आहे. इतकेच नव्हे तर एका अहवालानुसार यावर्षी इक्विटी मार्केटमध्येही भारत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश होईल. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंट अहवालानुसार, ज्यावेळी जगातील इतर देश आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी झुंज देत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

त्याचबरोबर भारताचा इक्विटी मार्केटही जगात पाचव्या क्रमांकावर असेल. अशावेळी जेव्हा विकसित देश २ ते ३ टक्क्यांनी प्रगती करत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्के वेगाने विकास करेल. त्याचबरोबर इतर उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत वेगाने विकास करेल. महत्वाचे म्हणजे यंदा चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार आहे.

इक्विटीजच्या माध्यमातून मिळणारे परतावेही ६ ते ८ टक्केपर्यंत असेल, असे या अहवालात म्हटले आहे. साधारणात: निश्चित उत्पन्नातच हे शक्य होते. जर भारतात महागाई वाढली तर किंमतींमध्ये वाढ होईल आणि मार्केटमधील वेग त्याप्रमाणात होणार नाही. शेअर बाजारात यंदाच्यावर्षी तेजी पाहायला मिळेल. या अहवालानुसार निफ्टीने ५० अंकाने उसळी घेतली आहे. सध्या १०,४९० ते १०,५८० पर्यंत आहे. जो यंदाच्या वर्षाअखेर ११,२०० ते ११,५०० पर्यंत जाऊ शकतो.