विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडन येथे पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या आणि भारताचे लंडनमधील राजदूत नवतेज सारना लंडनमधील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमनेसामने आल्याचा प्रकार घडला. यावेळी भारताच्या राजदूतांनी कार्यक्रमात मल्या उपस्थित असल्याचे पाहताच त्याठिकाणहून काढता पाय घेतला. १६ जून रोजी लेखक सुहेल सेठ आणि सनी सेन लिखित ‘मंत्राज फॉर सक्सेस: इंडियाज ग्रेटेस्ट सीईओज टेल यू हाऊ टू विन’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भारताचे लंडनमधील राजदूत नवतेज यांना निमंत्रण होते. मात्र, काही वेळानंतर विजय मल्या त्याठिकाणी प्रेक्षकांमध्ये येऊन बसले. विजय मल्याची प्रेक्षकांमधील उपस्थिती लक्षात आल्यानंतर भारताच्या राजदूतांनी असमाधान व्यक्त करत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वीच कार्यक्रमातून काढता पाय घेतला. दरम्यान, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे स्पष्टीकरण सुहेल सेठ यांच्याकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर भारतीय राजदूतांच्या उपस्थितीत एक स्वागतसमारंभही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विजय मल्या उपस्थित नसल्याचे स्पष्टीकरण सुहेल सेठ यांनी ट्विटरवरून दिले आहे.
विजय मल्या अखेर फरारी आरोपी घोषित 
काही दिवसांपूर्वीच विजय मल्या याला विशेष न्यायालयाने मंगळवारी अखेर ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित केले होते. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटसह बरीच अटक वॉरंट्स बजावण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्याला ‘फरारी आरोपी’ म्हणून घोषित करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवडय़ात विशेष न्यायालयाकडे केली होती. अतिरिक्त न्यायाधीश पी. के. भावके यांनी ‘ईडी’ची ही मागणी मान्य करत मल्या याला फरारी आरोपी म्हणून घोषित केले.