प्रशासकीय सेवेचा समाजहितासाठी उपयोग करून परिवर्तन घडविणाऱ्या देशभरातील १६ जिल्हाधिकाऱ्यांचा बुधवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात अकोला, नवी मुंबई, उस्मानाबाद आणि नागपूर येथे कार्यरत असताना दिलेल्या योगदानाबद्दल अनुक्रमे आस्तिक कुमार पांडे, तुकाराम मुंढे, डॉ. प्रशांत नारनवरे आणि माधवी खोडे-चावरे यांनाही सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, डॉ. जितेंद्र सिंग आणि ‘एक्स्प्रेस वृत्तसमूह’ संचालक मंडळाचे अध्यक्ष विवेक गोएंका हे यावेळी उपस्थित होते.

तुकाराम मुंढे

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने त्यांनी लोकोपयोगी आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालणारे उपाय योजले. २९ सेवा त्यांनी ऑनलाइन केल्या. मालमत्ता कराचा भरणा तसेच ठेकेदारांना त्यांची देयके थेट बँकेत भरता येतील, अशी सुविधा उपलब्ध करून दिली. नागरी कामांवर उपग्रह तंत्रज्ञानामार्फत लक्ष ठेवून त्या कामांना गती दिली तसेच वारंवार ती कामे करण्याची प्रथा रोखून कंत्राटदारांचे हित साधण्याच्या प्रवृत्तीला पायबंदही घातला.

माधवी खोडे- चावरे

एप्रिल २०१८ मघ्ये महिला आणि बालकल्याण विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध योजना राबवून जनजागृती केली. आदिवासी आश्रमशाळांत होणाऱ्या लैंगिक शोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिला. त्यासाठी त्यांनी आश्रमशाळांतील मुला-मुलींना विश्वासात घेऊन धीर दिला आणि मग आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला ही मुले धैर्याने वाचा फोडू लागली.

डॉ. प्रशांत नारनवरे

जलयुक्त शिवार योजनेबाबत जेव्हा तांत्रिक आक्षेप घेतले जात होते तेव्हा या योजनेचं त्यांनी केलेलं सादरीकरण उच्च न्यायालयानेदेखील वाखाणलं होतं. उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी असताना त्यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीचा विकास साधायला शेतकऱ्यांना मोठंच पाठबळ दिलं होतं. अनेक अभिनव उपक्रमांसाठी नारनवरे हे वाखाणले जातात.

आस्तिक  कुमार पांडे

अकोला येथे जिल्हाधिकारी असताना त्यांनी स्वच्छता अभियानाची चळवळ मोठय़ा प्रमाणात राबविली आणि लोकसहभागानं अनेक भागांचा कायापालट केला.  मोर्णा ही नदी कचऱ्यानं भरून डबक्यागत झाली होती. त्या नदीची लोकसहभागातूनच त्यांनी पूर्ण स्वच्छता केली आणि ती वाहती केली. या त्यांच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातही केला.