एका भारतीय कुटुंबाने ब्रिटीश एअरवेजवर वर्णद्वेषी वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. तीन वर्षांचे मूल रडले म्हणून आपल्या संपूर्ण कुटुंबाला ब्रिटीश एअरवेजच्या विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप भारतीय कुटुंबाने केला आहे. विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर सज्ज असताना काही वेळ आधी ही घटना घडली. या मुलाला त्याची आई शांत करण्याचा प्रयत्न करत असताना केबिन क्रू च्या सदस्यांनी या मुलाला दाटवणीच्या स्वरात शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मूल अधिक घाबरले व त्याने आणखी जोरात रडण्यास सुरुवात केली.

त्यानंतर वैमानिकाने विमान पुन्हा टर्मिनलमध्ये नेले तिथे या कुटुंबाला व त्यांच्या मागे बसलेल्या काही भारतीयांना खाली उतरवण्यात आले. भारतीय इंजिनिअरींग सर्व्हीसच्या १९८४ बॅचच्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत २३ जुलै रोजी ब्रिटीश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए ८४९५) फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला. सध्या हा अधिकारी रस्ते वाहतूक मंत्रालयात कार्यरत आहे. या अधिकाऱ्याने हवाई उड्डयाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार केली आहे.

ब्रिटीश एअरवेजने आपल्या कुटुंबाला अपमानास्पद व वर्णद्वेषी वागणूक दिल्याचा आरोप त्याने केला आहे. ब्रिटीश एअरवेजनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही असे आरोप अत्यंत गांभीर्याने घेतो. कुठल्याही प्रकारचा भेदभाव अजिबात सहन करणार नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी चालू केली असून संबंधिक ग्राहकाच्या संपर्कात आहोत असे या ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमानात सीट बेल्ट बांधण्याची घोषणा झाल्यानंतर माझ्या पत्नीने स्वतंत्र आसनावर बसलेल्या माझ्या तीन वर्षाच्या मुलाला सीट बेल्ट बांधला पण सीट बेल्टमुळे अस्वस्थ झालेल्या माझ्या मुलाने रडण्यास सुरुवात केली. त्याला अंगावर घेऊन माझी पत्नी शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तितक्या एक पुरुष क्रू मेंबर तिथे आला. तो माझ्या मुलावर ओरडला व त्याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले. त्याच्या दाटवणीच्या स्वरांनी माझा मुलगा आणखी घाबरला व त्याने आणखी जोराने रडणे सुरु केले.

आमच्या मागे बसलेल्या एका भारतीय कुटुंबाने मुलाला बिस्कीटे देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मूल रडत असतानाही माझ्या पत्नीने त्याला शेजारच्या सीटवर ठेवले व बेल्ट बांधला असे या अधिकाऱ्याने सुरेश प्रभूंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा तोच क्रू सदस्य तिथे आला व त्याने मुलाल धमकावले. रडणं थांबव नाही तर खिडकीतून बाहेर फेकून देईन अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर विमान पुन्हा टर्मिनलमध्ये नेण्यात आले तिथे आमच्या संपूर्ण कुटुंबाला खाली उतरवण्यात आले असे त्या अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे.