पाकिस्तानातील कराची येथील तुरुंगात एक भारतीय मच्छिमार संशयास्पदपणे मृत अवस्थेत आढळून आला. गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, लांधी तुरूंगात मृत पावलेल्या या कैद्याचे नाव किशोर भगवान आहे. त्याचे पार्थिव रूग्णालयात हलवण्यात आले असून, अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत पाकिस्तानी अधिका-यांकडून स्पष्टीकरण मिळण्याचे बाकी असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली. यापूर्वी कराचीतील तुरुंगात १९ डिसेंबर रोजी भिखा लाखा शियाल (३५) याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृ्त्यूचे कारणसुद्धा अद्याप समजले नसून, त्याचे पार्थिव अजूनही भारताच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. लवकरच त्याचे पार्थिव आमच्या ताब्यात मिळणार असल्याची माहिती भारतीय अधिका-यांकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मागील वर्षी जानेवारी महिन्यात किशोर भगवान याला अटक करण्यात आली होती. महिन्याभरानंतर तुरुंगांच्या भिंतीवर चढून तो पळून गेला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात किशोर भगवान कराचीतील रस्त्यांवर राहात असल्याची माहिती पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे.