इटलीच्या खलाशांनी केरळच्या तटवर्ती क्षेत्रात दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केली होती त्यापोटी इटलीकडून मिळणारी १० कोटी रुपये नुकसानभरपाई सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा करण्यात यावी, न्यायालयच त्या रकमेचे वाटप करील, असा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.

केंद्र सरकारकडे इटलीहून रक्कम जमा झाल्यानंतर ती एका आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा करावी, असा आदेश सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने केंद्र सरकारला दिला. पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी  आहे.

इटली सरकारच्या वतीने  वकील सुहैल दत्त यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय लवादाने २१ मे २०२० रोजी दिलेल्या निकालानुसार देय असलेली रक्कम परराष्ट्र मंत्रालय सांगले त्या खात्यामध्ये आजच जमा केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने याची नोंद घेतली.