भाषा, खाद्यपदार्थ, वेशभूषा, संस्कृती, परंपरा इत्यादीबाबत भारतात विविधता आहे. असं असलं तरी येथील नागरिक एकोप्याने रहातात. ‘विविधतेत एकता’ हेच भारताचं वैशिष्ट्य असून, अन्य देशांतील नागरिकांच्या मनात याविषयी विशेष कौतुक आणि कुतूहल पाहायला मिळते. हीच बाब विदेशी पर्यटकांना खुणावते.

प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. त्यामुळे पर्यटकांची आणि त्यात खवय्यांची चंगळ असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इथले मसाले आणि खाद्यसंकृती विदेशी पर्यटकांचा विशेष आकर्षणाचा विषय आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.

आजच्या इंटरनेटच्या युगात खाद्यपदार्थ आणि पर्यटनाला वाहून घेतलेले असंख्य चॅनल्स युट्यूबवर उपलब्ध आहेत. भारतीय खाद्यपदार्थांची ओळख करून देणे हा या चॅनल्सचा महत्वाचा भाग असतो. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया मंचावरदेखील भारतीय खाद्यपदार्थांचा बोलबाला आहे.

यासर्वांमध्ये ‘इंडिक्युरिअस विथ मंमझिस् अॅण्ड पापा’ खास ठरतो. यूट्युब, फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्रामवरदेखील ते उपलब्ध आहेत. ‘इंडिक्युरिअस विथ मंमझिस् अॅण्ड पापा’ ने पूर्णपणे भारतीय खाद्यपदार्थांना वाहून घेतले आहे. यातील ‘मंमझिस्’ हा आफ्रिकन शाब्द असून, तो मम्मीसाठी वापरला जातो. अमेरिकेतील जॅकलीन आणि पॅट्रिक नावाच्या आजी-आजोबांचा हा उपक्रम आहे. त्यांच्या चार पिढ्या भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. हे दाम्पत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकन लोकांसोबतच इतरांनादेखील भारतीय खाद्यपदार्थांची ओळख करून देते.

मंमझिस् आणि पापांना भारतीय खाद्यपदार्थ, संस्कृती, भारताचा इतिहास आणि भारतीयांविषयी विशेष आकर्षण आहे. ते अमेरिकेतील भारतीय उपहारगृहांना भेट देऊन विविध भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतात. हे करत असतांना भारतीय पदार्थांचे वैविध्य आणि वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहचवतात. भारतातील व्यक्तीला त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओमेरिकेतील भारतीय उपहारगृहांचा अनुभव घेता योतो. तर इतरांना भारतीय पदार्थांची खासियत पाहायला मिळते. अमेरिकेतील भारतीय उपहारगृहांना भेट देऊन प्रांतवार भारतीय खाद्यपदार्थ चाखण्यावर त्यांचा भर असतो. यात तीखट ते गोड असे सर्व पदार्थ ते चाखतात. आजीला खास करून गोड पदार्थ आवडतात.

अमेरिकेतील अभिरुची हॉटेलमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना

गाजर हलवा बनवताना

‘मिशन मंगळ’ चित्रपटाचा रिव्ह्यू देताना

मंमझिस् आणि पापा एवढ्यावरच थांबत नाहीत तर ते स्वत:देखील भारतीय खाद्यपदार्थांच्या रेसिपीज् करून पाहातात. पापा तर भारतीय चित्रपटांचे रिव्ह्यूदेखील करतात. मंमझिस् आणि पापांच्या यूट्युब चॅनलवर भारतीय खाद्यपदार्थांची कृती, अमेरिकेत मिळणारे भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय चित्रपटांचे रिव्ह्यू अशा विषयानुसार प्ले लिस्ट आहेत.

‘इंडिक्युरिअस विथ मंमझिस् अॅण्ड पापा’ युट्यूब चॅनलची माहिती आणि युजर्सच्या प्रश्नांची उत्तर देताना

भारतीय पदार्थांची आवड असणारे अनेकजण त्यांचे व्हिडिओ आवर्जून पाहतात. तर आजी-आजोबांनीदेखील युजर्सना प्रतिक्रिया आणि आवड कळवून प्रेत्साहन देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून ते अधिकाधिक भारतीय पदार्थ व्हिडिओच्या माध्यामातून जगभरात पोहचवू शकतील.

भारत आणि भारतीय पदार्थांच्या प्रेमापोटी याविषयीचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या आजी-आजोबांचं कौतुक करावं तेवढ कमी आहे.