13 December 2017

News Flash

पॅनकेक खाल्ल्यामुळे ९ वर्षीय भारतीय मुलीचा मृत्यू

नैनिकाची आई लक्ष्मी कौल या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत

लंडन | Updated: October 13, 2017 10:31 AM

वडिलांनी तयार केलेल्या पॅनकेकचा एक तुकडा खाल्ल्यामुळे एका नऊवर्षीय भारतीय मुलीचा मृत्यू झाला.

वडिलांनी तयार केलेल्या पॅनकेकचा एक तुकडा खाल्ल्यामुळे एका नऊवर्षीय भारतीय मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वायव्य लंडनमधील हॅरो येथे घडली. ‘इंडिपेंडट’ने दिलेल्या वृत्तानुसार, नैनिका टिक्कू या मुलीला दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी होती. त्यामुळे तिने आपले वडील विनोद यांच्या मागे लागून दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नसलेला पॅनकॅक बनवण्याचा हट्ट धरला. विनोद यांनी पॅनकेक बनवताना त्यात ब्लॅकबेरी टाकली होती. हा केक खाल्ल्यानंतर नैनिकाचा मृत्यू झाला.

नैनिकाने यापूर्वी कधीही फळ खाल्ले नव्हते. पण ब्लॅकबेरी पॅनकेकचा एक तुकडा खाल्ल्यानंतर तिचे शरीर संपूर्णपणे निळे पडले आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिच्या वडिलांनी लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधला. याचदरम्यान नैनिकाला हृदयविकाराचा झटका आला.

नैनिकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची गंभीर अवस्था पाहून व वाचण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला पुरवण्यात आलेली जीवरक्षक उपकरणे काढण्याचा निर्णय घेतला. नैनिकाची आई लक्ष्मी कौल या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत. हे एक दु:स्वप्न होते. प्रत्येक क्षण ती आमच्याबरोबर कायम राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या घटनेनंतर नैनिकाच्या आईवडिलांनी आता अॅलर्जीक दुग्धजन्य पदार्थांच्या संशोधनासाठी निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे. आम्हाला माहीत होतं की तिला दुग्धजन्य पदार्थाची अॅलर्जी आहे. तिला दमाही होता. मागील नऊ वर्षांपासून आम्ही तिला जपत होतो. या ९ वर्षांत एवढी एकच मोठी घटना घडली आणि आम्ही तिला गमावलं असे नैनिकाच्या आईने याबाबत लिहिलं आहे.

First Published on October 13, 2017 10:16 am

Web Title: indian girl dies after eating pancake