बॉलीवूडचा सुपरहिट ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी पाकिस्तानमधील एका भारतीय मुलीची कहाणी या चित्रपटासारखीच आहे. पाकिस्तानच्या कराचीतील ईदी सामाजिक संस्थेचा आसरा मिळालेल्या या भारतीय मुलीच्या कुटुंबियांचा गेल्या १४ वर्षांपासून शोध सुरू असून त्यास अद्याप यश आलेले नाही. तब्बल १४ वर्षांपूर्वी या बेपत्ता झालेल्या मुलीला पाकिस्तानच्या ईदी या सामाजिक संस्थेकडे पोलिसांनी सुपूर्द केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था या मुलीसाठी ‘बजरंगी भाईजान’मधील ‘बजरंगी’ सारखी मदत करीत आहे. गेल्या १४ वर्षांपासून तिची काळजी घेणाऱया इदी संस्थेने तिचे गीता असे नामकरण देखील केले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तिचे कुटंबिय आणि गावाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ईदी संस्थेचे कार्यकर्ते फैजल इदी यांनी सांगितले. सध्या २३ वर्षांची असणारी गीता तिच्या लहानपणी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, गीताने मोबाईलवर भारताचा नकाशा ओळखला होता. मात्र, इतर माहिती मिळविण्यात संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आले नाही. भारताच्या नकाशातील तेलंगणा आणि झारखंड राज्यांकडे बोट दाखवून गीता तिच्या इतिहासाबद्दल काही आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला सात भाऊ आणि चार बहिणी आहेत. एवढीच माहिती गीताच्या स्मरणात आहे.
गेल्या वर्षी भारतीय दूतावासाचे अधिकाऱयांनी देखील गीताची भेट घेतली होती. तिचे काही फोटो आणि इतर माहिती त्यांनी घेतली. परंतु, त्यानंतर पुढे काहीच झालेले नाही, असे फैजल यांनी सांगितले. गीताच्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी फेसबुक पेज देखील सुरू करण्यात आले आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आले नसल्याने इदी संस्थेने तिच्या पाकिस्तानातील नव्या आयुष्याला सुरूवात करण्याच्या दृष्टीने पाकिस्तानातील एका हिंदू मुलाशी विवाह करण्याचाही सल्ला गीताला दिला. मात्र, विवाह करण्यास स्पष्ट नकार देऊन मूळघराचा ठावठिकाणा लागल्यानंतरच विवाह करण्याचा निश्चय तिने केला आहे. कुटुंबियांचा ठावठिकाणा समजेल तो दिवस नक्की येईल, असा विश्वास गीताला आहे.