भारतात सातत्याने सोन्याची मागणी वाढत असल्यामुळे दुबई आणि सिंगापूर येथून मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात येते, अशी माहिती महसूल गुप्तचर वरिष्ठ संचालनालयाच्या अधिकाऱ्याने दिली.
महसूल गुप्तचर विभागाने गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिणेकडील शहरांमधून मोठय़ा प्रमाणात सोने जप्त केले आहे. गेल्या आठवडय़ात तामिळनाडूतील मदुराई विमानतळावर ८.४३ कोटी रकमेचे ३१.७५ किलो सोने जप्त करण्यात आले होते.
भारतात सोने खरेदीचे आकर्षण असल्यामुळे तस्कर दुबई आणि सिंगापूरमधून तुलनेने कमी दरातील सोने खरेदी करून त्याची भारतात तस्करी करतात. महसूल अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी तस्कर कुरिअर आणि प्रवाशी वाहतुकीद्वारे सोने भारतात पाठविण्यास प्रयत्नशील असतात, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सोन्याची तस्करी करण्यासाठी दुबई आणि सिंगापूर या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.