काँग्रेसचे प्रत्युत्तर; स्वायत्त संस्था साफ कोलमडल्याची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सक्तवसुली संचालनालय साफ कोलमडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी दिल्ली न्यायालयात केला होता. त्याला रविवारी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. २०१९ मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर मोदी व त्यांचे सरकार आणि ऑगस्टा वेस्टलँड यांच्या साटेलोटय़ाची चौकशी करू असे आव्हानच काँग्रेसने दिले आहे.

भाजप सत्तेत आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ऑगस्टा वेस्टलँण्डवर घातलेली बंदी उठवली असा दावा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. ईडी आज जरी सरकारच्या मदतीला धावून आले असले, तरी आम्ही सत्तेत आल्यावर चौकशी करण्यास बांधील आहोत असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. सरकारने मिशेलवर दबाव आणल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेस नेतृत्वाविरोधात  पुरावा जनतेपुढे ठेवावा असे आव्हान त्यांनी मोदी सरकारला दिले. ऑगस्टाशी असलेले साटेलोटे लपविण्यासाठी या प्रकरणी सरकार या मुद्दय़ाचे भांडवल करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यामुळे चौकीदार हा स्वच्छ नाही हे स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.

चौकशीला काँग्रेस का घाबरते-त्रिवेदी

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याचा बचाव काँग्रेस करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी चौकशीला घाबरण्याचे काँग्रेसला कारण काय असा सवाल भाजपने विचारला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देणे निषेधार्ह आहे. जेव्हा भ्रष्टाचार प्रकरणात एखादा परदेशी सापडतो तेव्हा गांधी कुटुंबातील सदस्याचे नाव का येते असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. मिशेलचे प्रत्यार्पण झाल्यापासून काँग्रेस अस्वस्थ असल्याचा टोला भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला आहे.

निवाडय़ाची ही नवीच पद्धत-चिदंबरम

पुराव्याशिवायच निकाल देण्याची नवी पद्धत मोदी सरकार, ईडी व माध्यमांनी सुरू केल्याचा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी लगावला. तर अशाच पद्धतीने जायचे असेल तर मग दूरचित्रवाणीवरच खटले चालवले जाऊ शकतील अशी उपहासात्मक टीका त्यांनी समाजमाध्यमांवरून केली.

एकाच कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न-यादव

एकाच कुटुंबाला बदनाम करणे हाच मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका विरोधकांचे प्रमुख नेते शरद यादव यांनी केली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशाने काहीच प्रगती केली नाही हे दाखविण्याची त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.