पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांना शनिवारी पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. अजय बिसारीया यांना रावळपिंडीतील गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये प्रार्थनेसाठी जायचे होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या तरीही त्यांना ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना पुन्हा इस्लामाबादला माघारी फिरावे लागले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा होती.

भारताने हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे. मागच्या काही महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी परस्परांवर त्रास दिल्याचे आरोप केले आहेत. बिसारीया गुरुद्वारामध्ये शिख भाविकांची भेट घेणार होते. मागच्या दोन महिन्यातील बिसारीया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे.

रावळपिंडी येथील पंजा साहिब हे गुरु नानक यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या शिखांसाठी महत्वाचे तीर्थस्थळ आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात अन्य भारतीय अधिकाऱ्यांनाही गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. शिख भाविकांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्यापासून रोखण्याच्या पाकिस्तानच्या या कृतीवर त्यावेळी भारताने राजनैतिक स्तरावर निषेध नोंदवला होता. खलिस्तान चळवळीला शिखांनी पाठिंबा द्यावा यासाठी पाकिस्तान ही भेट होण्यापासून रोखत आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातून दरवर्षी अनेक शिख भाविक पाकिस्तानी गुरुद्वारामध्ये साजरे होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.