बंगळुरूमधल्या भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेतल्या संशोधकांनी करोनाच्या अँटिबॉडी तपासण्यासाठीचं एक मशीन तयार केलं आहे. या मशीनच्या साहाय्याने करोनामुळे मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी तपासता येणार आहेत.

सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट तसंच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथे असलेल्या पॅथशोध हेल्थकेअर या कंपनीने हे इलेक्ट्रोकेमिकल मशीन तयार केलं आहे. करोनानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडी तपासण्याचं हे पहिलंच मशीन असल्याचं सांगण्यात येत आहे. आयसीएमआरने या मशीनच्या विक्रीला परवानगी दिलेली असून या मशीनच्या निर्मितीच्या मागे असलेले संशोधक येत्या दोन ते तीन आठवड्यात हे मशीन बाजारात आणणार आहेत.

पॅथशोधचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विनय कुमार यांनी सांगितलं की, या तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी शरीरातल्या करोनाच्या अँटिबॉडीज सूक्ष्मातिसू्क्ष्म पातळीवरही शोधता येतील. यासाठी रक्ताची तपासणी किंवा रक्तघटकाची तपासणी करावी लागेल. रक्त किंवा रक्तघटकाच्या नमुन्याच्या आधारे या अँटिबॉडी तपासता येतील. येत्या दोन ते तीन आठवड्यात आ्म्ही हे मशीन बाजारात आणण्याच्या विचारात आहोत. पॅथशोधची सध्याची निर्मिती क्षमता दर महिन्याला १ लाख यंत्रं इतकी आहे. यात आम्ही पुढे जाऊन वाढही करु शकतो. यामशीनसोबत चाचण्यांसाठीच्या स्ट्रिप्स मिळणार आहेत. ज्यामुळे आपल्याला अँटिबॉडीजचं प्रमाण कळून येईल. या मशीनच्या स्क्रिनवरती लगेचच आपल्याला या चाचणीचा निष्कर्ष पाहायला मिळेल. त्यामुळे यामध्ये कोणतीही एरर असणार नाही.

या कीटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेल्या चिपमध्ये एक लाखांहून अधिक चाचण्यांचे निष्कर्ष साठवून ठेवता येऊ शकतात. याला टचस्क्रिन डिस्प्ले, रिचार्ज करता येणारी बॅटरी, स्मार्टफोनसोबत जोडलं जाण्यासाठी ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा, स्टोरेज अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.

पॅथशोध ही संस्था आता याच मशीनवर रॅपिड अँटिजेन टेस्ट कशी करता येईल याबद्दल संशोधन करत आहे. करोनाची लागण झाली की नाही याची तपासणी त्याचबरोबर अँटिजेन तपासणी दोन्हीही एकाच मशीनमध्ये करता येणारं हे पहिलंच मशीन असणार आहे.