सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भारताची न्यायव्यवस्था ही जगामध्ये सर्वात मजबूत न्यायव्यवस्था असल्याचे वक्तव्य मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अखेरच्या भाषणामध्ये केले आहे. यावेळी त्यांनी तरुण वकिलांचीही मुक्तकंठानं स्तुती केली. ते म्हणाले की, भारतातील तरूण वकीलांकडे अफाट क्षमता आहे.

अखेरच्या भाषणामध्ये बोलताना मिश्रा म्हणाले की, ‘ भारताची न्यायव्यवस्था जगातील सर्वात मजबूत आणि विश्वासू न्यायव्यवस्थांपैकी एक आहे. यामध्ये न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे.’ दीपक मिश्रा यांनी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘माझ्या कारकिर्दीबद्दल मी पूर्णपणे संतुष्ट आहे. लोकांचा भूतकाळ पाहून मी त्यांची पारख करत नाही. त्याऐवजी मी त्यांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेतो. त्यातूनच मी त्यांना पारखतो.’

यापुढे रंजन गोगोई यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची जबाबदारी असणार आहे. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी दीपक मिश्रा यांच्या दूरदर्शीपणाचं यावेळी कौतुक केलं. दीपक मिश्रा हे एक असाधारण न्यायाधीश आहेत. नागरिकांचं स्वातंत्र्य जपण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली, असं गोगोई म्हणाले.