भटकत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेलेल्या भारतीय चित्त्याला गोळी मारून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या चित्त्याने दोन व्यक्तींना जखमी केल्यामुळे त्याला मारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
भारतीय चित्ता भटकत रविवारी लाहोरपासून ६० किमी अंतरावरील फिरोजवाला भागात गेला. या चित्त्याने लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. चित्त्याच्या हल्ल्याबाबत नागरिकांनी वन विभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळी घालून या चित्त्याला ठार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या चित्त्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन नागरिकांना शैखुरा जिल्ह्य़ातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भटकत पाकिस्तानी हद्दीत चित्ता जाण्याची ही मागील काही आठवडय़ांमधील दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानच्या नारोवाल क्षेत्रात गेलेल्या चित्त्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. या चित्त्याला लाहोर येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.