25 April 2019

News Flash

अॅमेझॉनवरून भारतीय उत्पादने जाणार दुबईमार्गे पाकिस्तानात?

अॅमेझॉनची क्लिकी डॉट पीके या पाकिस्तानातील कंपनीमध्ये गुंतवणूक असून ती वाढवण्याचा विचार अॅमेझॉन करत आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अॅमेझॉनवर ज्या भारतीय व्यापाऱ्यांची नोंदणी आहे ते कदाचित येत्या काळात थेट पाकिस्तानात आपला माल विकू शकतील अशी चिन्हे आहेत. अॅमेझॉनची क्लिकी डॉट पीके या पाकिस्तानातील कंपनीमध्ये गुंतवणूक असून ती वाढवण्याचा विचार अॅमेझॉन करत आहे. जर तसे झाले तर अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतीय माल दुबईमार्फत पाकिस्तानात पोचण्याची शक्यता असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे.

अॅमेझॉननं दुबईस्थित सोक या कंपनीचा ताबा घेतला असून तिच्या माध्यमातून क्लिकीमध्ये 33 टक्के हिस्सा अॅमेझॉनच्या मालकिचा आहे. हा हिस्सा वाढवण्याचा विचार कंपनी करत आहे. तसे झाले तर भारतीय व्यापारी अॅमेझॉनच्या माध्यमातून दुबईतल्या सोक या अॅमेझॉनच्याच कंपनीमार्फत क्लिकी या ऑनलाइन पोर्टलवर पाकिस्तानात माल विकू शकतील. भारत व पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांमदील व्यापारावर झाला आहे. भारतामधून 1200 वस्तू आयात करण्यावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. त्यामुळे दुबई अथवा अफगाणिस्तानच्या माध्यमातून पळवाटा काढून अप्रत्यक्षरीत्या भारतीय मालाची रवानगी पाकिस्तानात होते.

एका अहवालानुसार भारत पाकिस्तानमध्ये असलेला अधिकृत व्यापार 2.3 अब्ज डॉलर्सचा आहे तर अनधिकृत व्यापाराची व्याप्ती 4.7 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. कपडे, दागदागिने, खाद्यपदार्थ अशा अनेक भारतीय उत्पादनांना पाकिस्तानात मागणी आहे. सध्या यातली बहुतेक उत्पादने आधी दुबईला जातात आणि मग पाकिस्तानातील आयातदार ही उत्पादने दुबईतून आयात करतात. पाकिस्तानमधलं ऑनलाइन शॉपिंगची बाजारपेठ 100 दशलक्ष डॉलर्सची असून अॅमेझॉननं तिथं आपले पाय रोवले व क्लिकीमध्ये जास्त गुंतवणूक करून हिस्सा वाढवला तर भारतीय माल या माध्यमातून पाकिस्तानात जाऊ शकेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

First Published on April 11, 2018 3:20 pm

Web Title: indian merchants on amazon may sell products to pakistan via dubai