भारतीय हवामान खात्याचा उपक्रम; चक्रीवादळांच्या माहितीसाठी खास विभाग
मान्सून, तापमान यांच्या अंदाजाबरोबरच आता भारताने दक्षिण आशियायी देशांना एल निनोच्या स्थितीबाबतही ताजी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी एल निनोची स्थिती सांगितली जात असून, ती माहिती आता श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ व म्यानमार या देशांनाही उपलब्ध झाली आहे.
पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव राजीवन यांनी सांगितले की, दक्षिण आशियायी देशांना एल निनोबाबत माहिती देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. दर महिन्याला एल निनोच्या स्थितीबाबत सुधारित माहिती दिली जाईल, असे हवामान वैज्ञानिक एस.पै यांनी स्पष्ट केले.
पै म्हणाले की, जागतिक हवामान संघटनेने भारताला प्रादेशिक हवामान केंद्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आता दक्षिण आशियायी देशांना मान्सून, तापमान यांची माहिती देण्याची जबाबदारी भारतावर होतीच पण आता आम्ही एल निनोच्या स्थितीचीही माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
एल निनो परिणामामुळे मान्सूनवर विपरित परिणाम झाला होता तसेच हवामानाशी संबंधित टोकाच्या घटना दिसून आल्या होत्या. चेन्नईत डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला होता, तो तेथील सर्वाधिक पावसाचा शंभर वर्षांतील विक्रम होता. त्याचबरोबर थंडीतही तापमान वाढत आहे त्यालाही एल निनो कारणीभूत आहे असे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आले आहे.
दक्षिण आशियातील देशात शेती मान्सूनवर अवलंबून आहे. भारतीय हवामान खाते उत्तर हिंदूी महासागरातून निर्माण होणाऱ्या वादळांचीही माहिती पाकिस्तान, ओमान, मालदीव, थायलंड, म्यानमार, बांगलादेश व श्रीलंका या देशांना देते.
येमेन, सोमालिया येथील चक्रीवादळांची माहितीही भारताने दिली होती. भारतात चक्रीवादळांची माहिती देण्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्रात खास विभाग आहे. त्यातून हवामानाबाबत माहिती मिळते.
एल निनोचा पावसावर परिणाम
एल निनो हा महासागरातील उष्ण जलप्रवाहांशी संबंधित परिणाम असून तो मध्य तसेच पूर्व मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरात दिसून येतो. सागरी जलाचे तापमान वाढल्याने त्याचा दक्षिण आशियातील मान्सूनवर पर्यायाने तेथील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. एल निनो परिणामाने भारतातील मान्सूनच्या पावसाला चांगलाच फटका दिला असून लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.