पूर्व भूतानमध्ये शुक्रवारी भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण टीमचे चीता हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत वैमानिकांची ओळख पटली आहे. भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर असणाऱ्या रजनीश परमार यांचा मृत्यू झाला. दुसरे वैमानिक कॅप्टन कालझँग वांगडी हे भूतानच्या रॉयल आर्मीमध्ये होते. वाढदिवसाच्या दिवशीच रजनीश परमार यांचा मृत्यू झाला.

भूतानच्या योनफुलाजवळ दुपारी एकच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्देवी घटना घडली. दुपारीच्या एकच्या सुमारास या हेलिकॉप्टरचा रेडिओ संपर्क तुटला. खीरमुहून हे हेलिकॉप्टर योनफुला येथे येत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर लगेचच शोध मोहिम सुरु करण्यात आली.

मिसामारी, गुवहाटी आणि हाशीमारा येथून हवाई दल आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने शोध मोहिमेसाठी लगेच उड्डण केले. भारतीय लष्कर आणि भूतानच्या लष्कराचा वैमानिक या हेलिकॉप्टरमध्ये होते.