राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याच्या माओवाद्यांच्या डावपेचांचे इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून अनुकरण होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेपाळच्या सीमेवर पकडण्यात आलेल्या यासीन भटकळ आणि असदुल्लाह अख्तर या दहशतवाद्यांच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.
छत्तीसगढमधील दरभा येथे मे महिन्यात माओवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यामुळे केंद्र सरकारलाही मोठा हादरा बसला होता. सरकारला वठणीवर आणण्यासाठी या प्रकारचे हल्ले प्रभावी ठरू शकतील, या निष्कर्षांपर्यंत आमचे वरिष्ठ नेते आले असून, देशभरात तसे हल्ले घडविण्याचा विचार ते करीत आहेत, असे भटकळ आणि अख्तर यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. सर्वसामान्य नागरिकांना बॉम्बस्फोटांद्वारे लक्ष्य केल्यास सरकारवर त्याचा काहीच परिणाम होत नाही, यातील मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेश देऊन सरकार मोकळे होते. परंतु बॉम्बस्फोटांमध्ये राजकीय नेत्यांनाच लक्ष्य केल्यास सरकारला मोठा हादरा बसू शकतो, असे इंडियन मुजाहिदीनच्या नेत्यांना वाटत असल्याचे या दोघांनी सांगितले. या प्रकारचे घातपात घडविण्यासाठी माओवाद्यांची मदत घेता येईल का, याची चाचपणीही आमचे नेते करीत असल्याची माहिती या दोघांनी दिली.
सतर्क राहा..
या माहितीनंतर केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशभरातील सर्व राजकीय नेत्यांना पुरेशी सुरक्षा आहे की नाही, याची खात्री करा, राजकीय नेत्यांच्या मार्गक्रमणावर चोख बंदोबस्त ठेवा, जाहीर सभा व राजकीय कार्यक्रमांदरम्यान सुरक्षा तपासणीशिवाय कोणासही आत सोडू नका व जाहीर सभांचे चित्रीकरण करा आदी सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत.