सौदी अरेबियामधील एका महिलेने प्रश्न उत्तरे आणि चर्चेसाठी लोकप्रिय असणाऱ्या ‘क्वोरा’ या वेबसाईटवर दिलेले एक उत्तर व्हायरल होतं आहे.

आयशा फाहदा असे या महिलेचे नाव आहे. तिने प्रोफाइलमध्ये स्वत:ची ओळख स्वीडनमध्ये राहणारी मुस्लीम मुलगी अशी करुन दिली आहे. आणि तिच्या व्हायरल झालेल्या उत्तरामध्ये तिने भारतामधील मुस्लीम हे जगातील इतर कोणत्याही इस्लामिक देशामध्ये राहणाऱ्या मुस्लिमांपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

‘क्वोरा’वर एका व्यक्तीने भारतावर हल्ला करण्यासंदर्भातील एक प्रश्न विचारला. पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया एकत्रितपणे भारतीय मुस्लिमांना वाचवण्यासाठी भारतावर हल्ला का करत नाही? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला शंभरहून अधिक जणांनी उत्तरं दिले आहे. मात्र या सर्वांमध्ये आयशाच्या उत्तराला वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. क्वोरावरील या उत्तरात काय म्हणाली आहे आयशा जाणून घेऊयात तिच्याच भाषेत

प्रश्न:
भारतीय मुस्लिमांना वाचवण्यासाठी पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया एकत्रितपणे भारतावर हल्ला का करत नाही?

आयशाचे उत्तर:

मी स्वत: भारतीय नाही. पण मी हे खात्रीने सांगू शकते की, भारतामधील मुस्लीम हे जगातील इतर कोणत्याही इस्लामिक देशामध्ये राहणाऱ्या मुस्लिमांपेक्षा जास्त सुरक्षित आहेत.

जगातील सर्वच इस्लामिक देशांमध्ये इस्लामिक शिरीया कायद्याचे पालन केले जाते. हा कायदा एकपक्षीय आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे.

मी मूळची सौदी अरेबियाची आहे. मी माझे संपूर्ण बालपण सौदी अरेबियामध्येच घालवले आहे. मी सहा वर्षांची होती तेव्हापासून मी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी देण्यात येणाऱ्या मृत्यूदंडाची शिक्षा स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहे. इस्लाम धर्म सोडला म्हणून एकाला मृत्यूदंड दिल्याचे मी पाहिलंय, चोरी केली म्हणून एका चोराचा डावा हात कापलेला मी पाहिलंय आणि सर्वात भयंकर म्हणजे इस्लाममध्ये समलैंगिकता हा गुन्हा असल्याने तीन समलैंगिक तरुणांना एका उंच इमारतीवरून धक्का देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचेही मी पाहिले आहे.

इस्लामिक देशांमध्ये अशाप्रकारच्या क्रूर शिक्षा दिल्या जातात कारण त्या देशांचा कारभार हा शिरीया कायद्याप्रमाणे चालतो.

तर दुसरीकडे भारतामधील कारभार हा भारतीय संविधानाला अनुसरून चालतो. भारतीय संविधानामध्ये मानवाधिकार आणि स्त्री-पुरुष समानतेला महत्वाचे स्थान आहे. भारत हा जगातील सर्वोत्तम प्रजासत्ताक देशांपैकी एक आहे.

मी माझ्या वयाच्या २२ व्या वर्षापासून स्विडनमध्ये राहते. माझा प्रियकर भारतीय आहे. आम्ही मागच्या वर्षी भारतामध्ये जाऊन आलो. म्हणूनच मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हेच सांगू शकते की भारतीय लोकं खूप मोठ्या मनाचे आहेत. ते खूप धर्मनिरपेक्ष आहे. त्यांच्या इतकं धर्मनिरपेक्ष होणं कदाचित आपल्याला कधीच जमणार नाही.

मी स्वत: आज सौदी अरेबियामध्ये राहत असते तर आत्तापर्यंत माझा शिरच्छेद करण्यात आला असता. कारण मी अनेक पार्ट्यांना जाते आणि व्हिसी तसेच वाईनचेही सेवन करते. सौदी अरेबियामध्ये माझ्या प्रियकराचाही शिरच्छेद करण्यात आला असता, कारण वयाच्या 15 व्या वर्षीच त्याने शरीरसंबंध ठेवले होते.

त्यामुळे पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाने भारतीय मुस्लिमांना वाचवण्याऐवजी स्वत:च्या देशामदील लोकांच्या हिताची काळजी करण्यावर भर द्यायला हवा. भारतामधील मुस्लीम सुरक्षित आणि सुंदर जीवन जगत आहेत.

आयशाच्या या उत्तराला १६ हजार अपव्होट्स (म्हणजेच लाइक) मिळाले असून २०० शेअर मिळाले आहेत.