मुंबईत रंगलेल्या ‘कोल्डप्ले’ बँड कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.  मुंबईत रंगलेल्या जगप्रसिद्ध बॅडच्या कार्यक्रमात कला सादर करणाऱ्या ख्रिस मार्टिन या परदेशी कलाकाराने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईतील ककार्यक्रमात  ख्रिस मार्टिन या गायकाने कला सादर करताना आपल्या पॅन्टच्या मागील खिशामध्ये राष्ट्रध्वज खोचून नृत्य करण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. ख्रिस मार्टिनचा वाद निर्माण करणारे फोटो  सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत.

दरम्यान ख्रिस मार्टिनच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या कृत्यावर काँग्रेसनेही नाराजी वृक्त केली असून सरकारने या कलाकाराविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.  काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रध्वजाचा अपमान खपवू घेतला जाणार नाही असे सांगत सरकारने कायद्यानुसार  कलाकारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.   विरोधकांच्या आक्रमणानंतर शिवसेनेच्या नेत्या निलीमा गोरे यांनी देखील या घटनबद्दल संताप व्यक्त केला. परदेशी कलाकाराकडून राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेला अपमान खेदजनक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी असे त्यांनी म्हटले.

यापूर्वी ‘ग्लोबल सिटिझन’संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला सरकारने अनेक सवलती दिल्याच्या कारणावरुन या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर  बहुचर्चित कार्यक्रमात घडलेल्या या घटनेमुळे विरोधकांना एक नवा मुद्दा मिळाला असून या कार्यक्रमातील प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.