पूर्व लडाखमध्ये अजूनही तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय नौदलाकडून उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या महत्त्वाच्या तळांवर मिग-२९के फायटर विमानांची तैनाती सुरु आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात ४० पेक्षा जास्त मिग-२९के विमाने आहेत. त्यात १८ विमाने आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू युद्धनौकेवर तैनात आहेत. उर्वरित मिग-२९ के विमाने गोवा येथील नौदलाच्या बेसवर असतात.

ही मिग-२९ के विमाने मूळची रशियन बनावटीची आहेत. गोव्यातील नौदलाच्या बेसवरुन काही विमाने उत्तरेकडील इंडियन एअर फोर्सच्या तळावर हलवली आहेत. चीन सीमेवरील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

चीन विरोधात लष्करी स्थिती बळकट करण्यासाठी IAF ने उत्तरेच्या बेसवरुन अनेक फायटर विमाने लडाखमध्ये तैनात केली आहेत. नौदलाच्या फायटर विमानांचा वापर नेमका कशासाठी करणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. ‘विमाने आणि वैमानिक उपलब्ध असतील, तर त्याचा वापर का करु नये?’ असे निवृत्त नौदल अधिकारी डी.के.शर्मा म्हणाले.

सध्या लडाखमध्ये नौदलाच्या P-8I विमानाचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या विमानाचा वापर होत आहे. P-8I विमाने अमेरिकेकडून विकत घेण्यात आली आहेत. डोकलाम वादाच्यावेळी सुद्धा या विमानांचा वापर करण्यात आला होता. हिंदी महासागरात नौदलही पूर्णपणे सर्तक असून चिनी नौदलाच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय नौदलाचे अत्यंत बारीक लक्ष आहे.