नौदलाने दीर्घकालीन योजनेत तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात सामील करण्याचे ठरवले आहे, असे नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी मंगळवारी सांगितले. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका २०२२ पर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्पात नौदलासाठीच्या तरतुदीत करण्यात आलेल्या कपातीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास नौदल सज्ज आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका २०२२ पर्यंत कार्यान्वित होईल तसेच त्यावर मिग २९-के विमाने तैनात करण्यात येतील. नौदलासाठी वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूद गेल्या पाच वर्षांत १८ टक्क्य़ांवरून १३ टक्के झाली आहे. नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरतुदीतील ही कपात योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

चिनी जहाजाला हुसकावले
पोर्ट ब्लेअरजवळ भारताच्या सागरी हद्दीत घुसलेल्या चीनच्या जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावले. अंदमान-निकोबार बेटावर शी यान १ या चीनच्या जहाजामार्फत संशोधन कार्य सुरू होते.

पाकिस्तानचा गोळीबार, महिलेसह दोघे ठार
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एक ३५ वर्षीय महिला आणि एक १६ वर्षीय युवक ठार झाले तर अन्य नऊ जण जखमी झाले.