तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांबाबत केलेल्या वक्तव्यांची गंभीर दखल ‘द इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ घेत आहे. प्रसारमाध्यमांबाबत आक्षेप अथवा कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यासाठी न्यायालयीन आणि वैधानिक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपले प्रसारमाध्यमांविषयी असलेले आक्षेप नोंदविल्याच्या बातम्या पुढे आल्या, त्या लक्षात घेता धाकदपटशा दाखविणे किंवा धमक्या देणे याला लोकशाही समाजात स्थान नाही, याची जाणीव पुन्हा एकदा करून देणे गरजेचे आहे. विशेषत: धमक्या देणारी व्यक्ती जर उच्चपदस्थ असेल तर..
त्यामुळेच प्रसारमाध्यमांच्या सदस्यांना कोणत्याही प्रकारे धाकदपटशा दाखविण्याचा किंवा धमक्या देण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व उपलब्ध स्रोतांचा वापर करून सोसायटी अशा प्रयत्नांचा तीव्र प्रतिकार करेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे ‘द इंडियन न्यूजपेपर सोसायटी’चे व्ही. शंकरन यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.