19 September 2020

News Flash

Dr Govindappa Venkataswamy Google Doodle : लाखो लोकांना दृष्टी देणाऱ्या या भारतीय व्यक्तीला गुगलची मानवंदना

गोविंदप्पा त्यांच्या कार्याची दखल घेत १९७३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले

गुगल डुडल कायमच काही ना काही नवीन प्रयोग करुन आपल्या युजर्सना सुखद धक्का देत असते. प्रत्येक देशातील किंवा विशिष्ट दिवसाचे महत्त्व शोधून त्यानुसार संशोधन करुन हे डुडल बनवले जाते. यामध्ये भारतीय लोकांचीही अनेकदा वर्णी लागले. आज असेच एका प्रसिद्ध भारतीय व्यक्तीचे डुडल बनविण्यात आले आहे. डॉ. गोविंदप्पा व्यंकटस्वामी यांच्यावर हे डुडल बनविण्यात आले आहे. त्यांची आज १०० वी जयंती असल्याने गुगलने त्यांना हा विशेष मान दिला आहे. डॉ. गोविंदप्पा हे प्रसिद्ध असे नेत्ररोगतज्ज्ञ होते. इतकेच नाही तर लाखो लोकांना दृष्टी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याने गुगलने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

डॉ. गोविंदप्पा यांचा तमिळनाडूतील वडामल्लपुरम येथे १ ऑक्टोबर १९१८ रोजी जन्म झाला. चेन्नईमधील स्टॅनली मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात फिजिशियन म्हणून काम केले. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले. त्यानंतर ते शस्त्रक्रिया करु शकत नव्हते. मात्र त्यांनी परिस्थितीवर मात करत स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचे ठरवले. मग ते मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया करायला शिकले. त्यानंतर त्यांनी लोकांची ही समस्या दूर करण्याचा जणू ध्यासच घेतला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. गोविंदप्पा यांनी लाखो लोकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे या लोकांना दृष्टी मिळाली आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश आला.

१९७६ मध्ये डॉ. गोविंदप्पा यांनी अरविंद आय हॉस्पिटलची स्थापना केली. या हॉस्पिटलच्या माध्यमातूनही लोकांच्या डोळ्यांच्या समस्या दूर करण्याचे काम केले जाते. आजही वर्षाला २ लाखहून अधिक लोकांवर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे उपचार अतिशय कमी खर्चात किंवा मोफत केले जातात. गोविंदप्पा त्यांच्या कार्याची दखल घेत १९७३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. कायम रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. गोविंदप्पा यांचा ७ जुलै २००६ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 1:47 pm

Web Title: indian ophthalmologist dr govindappa venkataswamy google doodle celebrates 100th birthday
Next Stories
1 International Coffee Day : जाणून घ्या कॉफीच्या शोधाची रंजक गोष्ट
2 International Coffee Day : जगातील महागडी कॉफी तयार होते उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून
3 VIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट
Just Now!
X