News Flash

धक्कादायक!…अमेरिकेत भारतीय वंशाच्या उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दक्षिण कॅरोलिनातील घराबाहेरच हर्निश पटेल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील कन्सासमध्ये भारतीय तरुणाची वंशभेदातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण कॅरोलिनात गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक हरनिश पटेल यांनी गुरुवारी रात्री ११.२४ वाजताच्या सुमारास लँकास्टरस्थित आपले दुकान बंद केले. त्यानंतर दहा मिनिटांनी पटेल यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. दरम्यान, कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची वंशभेदातून हत्या झाल्याच्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला होता. कन्सासमध्ये जे काही घडले ते दुःखद होते, असे त्यांनी म्हटले होते.

उद्योजक पटेल यांच्या हत्येप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे लॅँकास्टर येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पटेल यांच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही हत्या वंशभेदातून झाली नसावी, असे पोलीस प्रमुख बॅरी फेली यांनी स्पष्ट केले आहे. गेल्याच आठवड्यात कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या वंशभेदातून झाल्याचे स्पष्ट झाले होते. श्रीनिवास आणि अलोक मदासानी हे दोघेजण एका बारमध्ये बसलेले होते. अमेरिकन नौदलातील माजी अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या देशातून चालता हो असे म्हणत त्याने गोळीबार केला. या घटनेमध्ये अलोक हा जखमी झाला आहे. श्रीनिवास याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या इयान ग्रिलोटला देखील गंभीर जखम झाली आहे. स्पायसर यांनी यावेळी विद्वेषातून होणाऱ्या घटनांचा निषेध केला. धर्म आणि वंशाच्या आधारे होणाऱ्या भेदभावाला या देशात स्थान नाही असे त्यांनी म्हटले. धर्म आणि वंशाच्या मुद्दावरुन होणाऱ्या हिंसा थांबाव्यात यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत असे ते म्हटले. अमेरिकेच्या स्थापनेपासून येथे नागरिकांच्या स्वातंत्र्याची जपणूक केली जाते असे ते म्हणाले. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार असल्याचे स्पायसर यांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मूलभूत हक्कांचे संवर्धन व्हावे समर्पित भावनेने काम करत असल्याचे स्पायसर यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:11 pm

Web Title: indian origin businessman shot dead in south carolina after kansas shooting
Next Stories
1 अमेरिकेत बसून भारतात राहणा-या पत्नीला दिला व्हॉट्स अॅपवर तलाक
2 अकबर दहशतवादी होता; राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
3 बाबरी कृती समितीचे प्रमुख आणि माजी खासदार शहाबुद्दीन यांचे निधन
Just Now!
X