वर्णद्वेषातून अमेरिकेतील कन्सास शहरात भारतीय तंत्रज्ञाची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता भारतीय वंशाच्या एका मुलीला वांशिक शिवीगाळ आणि अपमानाला तोंड द्यावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या एकता देसाई या मुलीला  ‘येथून चालती हो’ असे दरडावत एका कृष्णवर्णीय नागरिकाने अपशब्द वापरले.

२३ फेब्रुवारीच्या या घटनेची ध्वनिचित्रफीत एकता हिने समाजमाध्यमांवर प्रसारीत केली. त्यानंतर समाजमाध्यमावर उलट-सुलट प्रतिक्रियांचा धुरळा उडाला आहे.  ‘संबंधित व्यक्तीच्या रागावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तरीही त्याचा त्रागा सुरूच होता’, असे एकताने  ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे.  या घटनेनंतर देसाई हिने मानवी हक्क कार्यकर्ते कुंदन श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला. ते ‘द व्हॉइस रेजर’ या संकेतस्थळाचे संस्थापक आहेत. याच संकेतस्थळावरून ध्वनिचित्रफीत ‘अपलोड’ झाली. अमेरिकी सरकारने या व्यक्तीला महिलेस शिवीगाळ व अपशब्द केल्याप्रकरणी तसेच देशाचा अपमान केल्याप्रकरणी शिक्षा करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे.