उत्कृष्ट पत्रकारिता आणि साहित्यकृतीसाठी दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांना ही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. मेघा राजगोपालन यांना जगासमोर चीनचा खरा चेहरा उघडकीस आणल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या अहवालांमधून असे दिसून आले आहे की, चीनने ‘रिएज्यूकेशन कॅम्प’ म्हणजेच शिबिरांमध्ये उइगुर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यक गटांना कैदेत ठेवले आहे. यासाठी राजगोपालन यांनी यासाठी उपग्रहातून काढलेल्या फोटोंचे  विश्लेषण केले होते. या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी रात्री झाली.

आंतरराष्ट्रीय पत्रकारीता प्रकारात मिळालेला हा पुरस्कार मेघा राजागोपालन यांनी इंटरनेट मीडिया बझफिड न्यूजच्या दोन सहकाऱ्यांसोबत वाटून घेतला आहे. राजगोपालन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरात राहणाऱ्या सुमारे २४ लोकांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमधील माहितीचा सत्यता तपासण्यासाठी त्यांनी उपग्रहातून काढलेले फोटो आणि थ्रीडी सिम्युलेशनचा वापर केला होता. हे सर्व पाहून आपल्याला पूर्णपणे धक्का बसला असून याची कल्पनाही केली नव्हती अशी प्रतिक्रिया राजगोपालन यांनी दिली आहे. प्रकाशनाच्या माहितीनुसार, राजगोपालन आणि त्याचे सहकारी एलिसन किलिंग आणि क्रिस्टो बुशेक यांनी मिळून अशा २६० शिबिरांचा अभ्यास केला होता.

‘रिएज्यूकेशन कॅम्प’च्या नावाखाली मुस्लिमांवर अत्याचार

चीनने अनेकदा शिनजियांगमध्ये राहत असलेल्या उइगर मुस्लिमांवर दहशतवाद पसरवल्याचा आरोप करत बंदी आणत आणली होती. शिनजियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी उइगर मुस्लिमांना चेतावणी देत, कुराण तसंच नमाज पठण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींसहित सर्व धार्मिक गोष्टी सोपवल्या नाही तर शिक्षेस पात्र असतील असं सांगितलं होतं.

कझाकिस्तानमध्ये घेतली मुलाखत

यासाठी राजगोपालन यांनी एक मोठा डेटाबेस तयार केला होता. त्यांना चीनमध्ये शिबीरातील लोकांची मुलाखत घेण्याची देखील इच्छा होती, परंतु त्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी शेजारच्या कझाकिस्तानमध्ये छावण्यांमधून पळून गेलेल्या लोकांशी भेटून संवाद साधला होता आणि माहिती गोळा केली होती.

भारतीय वंशाच्या दुसर्‍या पत्रकार नील बेदी यांनाही पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. स्थानिक अहवाल प्रकारात त्यांनी लिहिलेल्या वृत्तांसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. टेंपा बे टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या फ्लोरिडामधील सरकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या मुलांच्या तस्करीविषयी बेदी यांनी एक शोधकथा लिहिली होती.

जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडिओ शूट करणारीला पुरस्कार

अमेरिकतेली जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येचा व्हिडिओ काढणाऱ्या  डार्नेला फ्रेझियरलाही हा पुरस्कार मिळाला आहे. मिनेसोटा येथे ही घटना घडली होती. त्यानंतर अमेरिकेसह जगभरातील लोकांनी जातीय हिंसाचाराविरोधात निषेध व्यक्त केला होता. ही व्हिडिओ क्लिप जगभरात व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कृत्याविषयी जगभरातून टीका करण्यात येत होती.