भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. अनिता या वॉशिंग्टनमधील मेरीलँड उपनगरात टाकोमा पार्क येथे राहत होत्या. आई, आरोग्य तज्ज्ञ, मुलगी, बहीण व मित्र या सर्वच नात्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. त्यांचा जन्म पश्चिम मॅसॅच्युसेट्स येथे झाला व उत्तर न्यूजर्सी येथे पुढील काळ गेला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या जोसेफ मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ व स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स या संस्थांतून एमपीएच व एमपीए या पदव्या घेतल्या होत्या. सेनेगल येथे त्यांनी १९९७-१९९९ या काळात दोन वर्षे काम केले. जागतिक आरोग्य व आंतरराष्ट्रीय विकास या दोन क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले. पॅलाडियम समूहात त्या वरिष्ठ व्यवस्थापक होत्या.