अमेरिकेमध्ये एका मुस्लिम-अमेरिकी महिलेने स्थानिक निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला असून, राहिला अहमद नावाच्या या २३ वर्षीय महिलेचे वडील भारतीय तर आई पाकिस्तानी आहे. प्रवासी नागरिक आणि मुसलमानांच्या विरोधातील वक्तव्यांचा बोलबाला असलेले अमेरिकेतील राज्य मेरीलँड येथे तिने हा विजय नोंदविला. बऱ्याच काळापासून प्रशासकीय कारभार सांभाळत असलेल्या व्यक्तीपेक्षा १५ टक्के अधिक मते प्राप्त करून मेरीलँड प्रिंस जॉर्ज काऊंटीमधील स्कूल बोर्डाची निवडणूक राहिलाने जिंकली. याच पदासाठीच्या निवडणुकीत चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये तिच्या पदरी अपयश आले होते. या जिल्ह्यातील ८० टक्के जनता ही अफ्रिकी-अमेरिकन असल्याने राहिलाच्या विजयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.

राहिलाला रिपब्लिकन राष्ट्रीय समितीचे पूर्वाध्यक्ष माइकल स्टील यांचे समर्थन होते. ज्यादिवशी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्याच दिवशी हिजाब परिधान करणारी माझ्यासारखी महिला सार्वजनिक कार्यालयात सेवा प्रदान करण्यासाठी निवडून आली ही खरोखरीच एक लक्षवेधी घटना आहे. ही घटना अमेरिकेतील जनतेच्या विचारांमधील विविधता दर्शविते. त्याचप्रमाणे अमेरिकी स्वप्न अद्याप चांगल्या स्थितीत असून जिवंत असल्याची साक्ष देत असल्याचे मत या प्रसंगी बोलताना राहिलाने व्यक्त केले.