समाजोपयोगी संशोधनाचा गौरव

भारतीय वंशाचे नाशिकला जन्मलेले वैज्ञानिक रमेश रासकर यांना ‘लेमेलसन एमआयटी’चा प्रतिष्ठेचा ५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी जगातील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. रासकर हे एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रीसर्च ग्रुपचे संस्थापक असून मीडिया आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेत सहायक प्राध्यापक आहेत. नवप्रवर्तनात्मक संशोधन त्यांनी केले असून जीवनातील समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या नावावर सध्या ७५ पेटंट असून १२० शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘फेमटो फोटोग्राफी’ या अल्ट्रा फास्ट इमेजिंग सिस्टीमचा शोध लावण्यात त्यांचा सहभाग होता.

कमी खर्चातील डोळ्यांची काळजी घेणारी तंत्रे त्यांनी विकसित केली असून त्यांच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुस्तकाची पाने न उघडता पुस्तक वाचता येते. रासकर हे संशोधन क्षेत्रातील उमदे नेतृत्व असून  त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावून समाजाला जोडण्याचे काम केले. जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते काम करीत आहेत. त्यांनी एमआयटी न्यूजला सांगितले की, पुरस्काराची निम्मी रक्कम ते संशोधन सुविधा मंच तयार करण्यासाठी वापरणार आहेत, त्याचा फायदा तरूणांना सहसंशोधनासाठी होईल. प्रत्येकात प्रश्न सोडवण्याची क्षमता असते व योग्य सहकार्य केले तर मोठे काम उभे राहू शकते. त्यामुळे अब्जावधी लोकांना फायदा होतो.  दृष्टिसंवेदनाबाबत तांत्रिक पातळीवर आणखी मोठे काम करण्याची त्यांची इच्छा आहे. २००८ मध्ये त्यांनी एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर लॅब स्थापन केली. तेथे प्रतिमाचित्रण यंत्रे तयार केली जातात.