ब्रिटनमध्ये ७ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वीच यूके इण्डिपेण्डन्स पार्टीच्या (यूकेआयपी) भारतीय वंशाच्या उमेदवाराला ज्यूविरोधी वक्तव्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
सदर उमेदवाराचे नाव जॅक सेन असे असून त्याचे आजोबा भारतीय होते आणि ते ब्रिटिश इंडियन आर्मीत डॉक्टर होते. जॅक सेन पश्चिम लँकेशायर परगण्यातून निवडणूक लढविणार होते.
लेबर पक्षाच्या ज्यू उमेदवार ल्युशियाना बर्गर यांच्याविरुद्ध सेन यांनी समाजमाध्यमांद्वारे टीका केली. बर्गर यांच्या एकनिष्ठतेवरून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. ज्यू ज्या देशात वास्तव्य करतात त्यापेक्षाही ते इस्राएलशी एकनिष्ठ असतात, असा संदर्भ सेन यांनी दिला.
दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांने समाजमाध्यमांचा वापर करून सदर संदेश दिला आहे, आपण सदर वक्तव्य केलेले नाही, असे सेन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र या वक्तव्याबाबत अधिक तपशील देण्यास सेन असमर्थ ठरले.