News Flash

तालिबानच्या हल्ल्यात भारतीय छायाचित्रकाराचा मृत्यू 

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती.

जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा शुक्रवारी अफगाणिस्तानात छायाचित्रण करताना तालिबानी बंडखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दिकी ४० वर्षांचे होते. काही दिवसांपासून कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीचे छायाचित्रण ते करीत होते, असे अफगाणिस्तानातील ‘टोलो न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनी दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळले होते. २०१० मध्ये ते रॉयटर्समध्ये दाखल झाले होते.

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी सिद्दिकी यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. अफगाण सुरक्षा दलांबरोबर असताना सिद्दिकी यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. अफगाणी सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीला सुरुवात केल्यानंतर तालिबानी बंडखोरांनी डोके वर काढले. सुरक्षा दले आणि तालिबान्यांमध्ये कंदहारनजीकच्या भागात तुंबळ धुमश्चाक्री सुरू आहे. अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग काबीज केल्याचा दावा तालिबानने अलीकडेच केला आहे.

‘पुलित्झर’ने सन्मानित

सिद्दिकी व त्यांचे सहकारी अदनान अबिदी यांना २०१८ मध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या पेचप्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिद्दिकी यांनी २०२० मधील दिल्ली दंगल, करोना विषाणू साथ, नेपाळमधील २०१५चा भूकंप, मोसुलमधील २०१६-२०१७चा संघर्ष, हाँगकाँगमधील दंगली यांचे छायाचित्रांकन केले होते. त्यांची छायाचित्रे वाखाणली गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:03 am

Web Title: indian photographer killed in taliban attack akp 94
Next Stories
1 कावड यात्रा रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना
2 करोनामुळे मुक्त केलेले कैदी तूर्त तुरुंगाबाहेरच
3 भयभीत नेत्यांनी पक्ष सोडावा – राहुल गांधी
Just Now!
X