अमेरिकेतील सगळ्यात मोठय़ा, सुमारे २० कोटी डॉलरच्या क्रेडिट कार्ड घोटाळ्यात आपला सहभाग असल्याची कबुली न्यू जर्सी येथील विजय वर्मा या भारतीय वंशाच्या एका दागिन्यांच्या दुकानदाराने दिली आहे. या घोटाळ्यात सहभागाची कबुली देणारा तो १८ वा आरोपी आहे. या खटल्यात त्याला १५ वर्षे सश्रम कारावास होऊ शकतो. अमेरिकेतील हा आजवरचा सगळ्यात मोठा क्रेडिट कार्ड घोटाळा समजला जातो.
या घोटाळ्यातील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘क्रेडिट ब्युरों’मधून तब्बल ७००० क्रेडिट कार्डे तयार करून घेतली. बनावट कागदपत्रांच्याच आधारे या कार्डधारकांची पतक्षमतासुद्धा (परतफेडीची क्षमता) वाढवून घेण्यात आली. त्यानुसार क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्याचा आणि त्या रकमेची परतफेड केल्याचा बनावट इतिहाससुद्धा तयार करण्यात आला. त्यानंतर या क्रेडिट कार्डावर भरपूर खरेदी अथवा कर्जे घेण्यात आली आणि त्यांचा भरणा केला गेलाच नाही.
विजय वर्माचे न्यू जर्सीमध्ये दागिन्यांचे दुकान आहे. यातील बहुतांश बनावट कार्डे त्याच्याच दुकानात वापरण्यात आली होती. ही कार्डे स्वाइप करणारे बनावट आहेत, हे माहीत असूनही आपण त्यांना व्यवहार करू दिला, अशी कबुली विजय वर्माने पोलिसांना दिली. या खटल्याचा निकाल येत्या सप्टेंबरमध्ये लागणे अपेक्षित असून वर्माला २.५ लाख डॉलरचा दंडही भरावा लागेल, अशी शक्यता आहे.