गलवानमध्ये गोळीबारच हवा होता

चीनची घुसखोरी मोठय़ा कटाचा भाग

दूरसंचार क्षेत्रात चीनची गुंतवणूक नकोच

गेल्या सहा वर्षांमध्ये भारताने चीनशी संबंध दृढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असले तरी ‘भारतातील राजकारण्यांना चीन कळलेलाच नाही,’ असे परखड मत चीनविषयक तज्ज्ञ व सामरिक भाष्यकार जयदेव रानडे यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात मांडले. गलवान खोऱ्यात चिनी विश्वासघाताला गोळीबारानेच प्रत्युत्तर द्यायला हवे होते, असेही ते म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या धुमश्चक्रीच्या पाश्र्वभूमीवर, ‘चीन : चरित्र आणि चाल’ या विषयावर जयदेव रानडे यांनी विविधांगी भाष्य केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

चीन हा परंपरा मानणारा देश असून राष्ट्राच्या हितासाठी फसवणूक, धोका आणि दिशाभूल करण्यात चीनला काहीही गैर वाटत नाही. चीन आपल्याशी व्यापार करतो, महाबलिपुरममध्ये चर्चा करतो, असे जरी दिसत असले तरी, त्यांच्यासाठी त्यांचे सार्वभौमत्व सर्वाधिक महत्त्वाचे असते; पण हा चिनी प्रखर राष्ट्रवाद भारतातील राजकारण्यांनी समजून घेतलेला नाही. त्यांच्या आदरातिथ्याला भुलून जाणे योग्य नव्हे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी २०२१ पर्यंत म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शतकपूर्तीपर्यंत चीनच्या एकीकरणाचे ध्येय ठेवले होते, त्यात लडाख, अरुणाचल प्रदेश हेही प्रदेश येतात. चीनचे दूरगामी धोरण समजून न घेता चीनशी संबंध ठेवणे नेहमीच धोक्याचे ठरते, असे रानडे म्हणाले.

चीनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केला होता. आताही क्षी जिनपिंग यांच्या पंतप्रधान मोदींशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर गलवानमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. १९६२ मध्ये भारताला सक्षम प्रत्युत्तर देता आले नव्हते; पण या वेळी भारताच्या लष्कराने चिनी सैनिकांना तगडे प्रत्युत्तर दिले. भविष्यात दोन्ही देशांमध्ये तीव्र लष्करी संघर्ष झालाच तर, चीनचेही मोठे नुकसान होईल, असे रानडे यांनी सांगितले.

गोळ्या घालायला हव्या होत्या..

गलवान खोऱ्यात १५ व १६ जून रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारतीय जवानांनी शस्त्रांचा वापर करायला हवा होता. चिनी सैनिकांनी विश्वासघात करून जवानांवर प्राणघातक हल्ला केल्यावर, शस्त्रे न वापरण्याच्या अटीचे पालन करण्यापेक्षा चिनी सैनिकांवर गोळीबार करून प्रत्युत्तर द्यायला हवे होते, असे मत रानडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले, तेव्हा अफजल खानाने दगाफटका करायचे ठरवले होते; पण शिवाजी महाराज सतर्क होते म्हणून ते वाचले, असे उदाहरणही रानडे यांनी दिले.

कुणालाही जबाबदार धरले जात नाही म्हणून..

कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या घुसखोरीची माहिती स्थानिक मेंढपाळ , नंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि त्यानंतर रॉ-आयबीकडूनही मिळाली होती; पण ती लष्कराने गांभीर्याने घेतली नाही. कारगिल सीमेवर देखरेखीसाठी जवान गेले तेव्हा गांभीर्य समजले. पठाणकोटमध्येही दहशतवादी हल्ला होणार याची माहिती असूनही हल्ला झाला. कोणी कुठल्याही माहितीसाठी आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी उत्तरदायी नसेल तर हल्ला होणारच. २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्लय़ाचीही माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. समुद्रमार्गाने येणार, कुठली हॉटेल्स लक्ष्य आहेत, दहशतवादी केव्हा येणार हेही सांगितले गेले होते, अशी माहिती रानडे यांनी दिली.

भारताने सतर्क राहावे..

गलवान खोऱ्यात चीनने केलेली घुसखोरी हा मोठय़ा कटाचा भाग असू शकतो. त्यामुळे भारताने सतर्क राहायला हवे, असा युक्तिवाद रानडे यांनी केला. गलवानमध्ये चिनी सैनिक मागे हटले म्हणजे भारताची सरशी झाली असे मानू नये. चीन अजिबात घाबरलेला नाही. त्यांनी गलवानमध्ये घुसखोरी करण्यापूर्वी भारताच्या लष्कराच्या ताकदीचा, क्षमतेचा, पंतप्रधान मोदींच्या राजनैतिक धोरणांचा अभ्यास केला असणारच. आत्ता चीनने माघार घेतली तरी पुन्हा तो सैनिकी कारवाई करणारच नाही असे नव्हे, असा इशाराही रानडे यांनी दिला.

चीनच्या गुंतवणुकीवर निर्बंध हवेत : देशातील दूरसंचारसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये चीनला शिरकाव करू देऊ  नये. पूर्वीही तसे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आणले गेले होते; पण त्यावर निर्णय घेतले गेले नाहीत. आता मात्र केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेसाठी संवेदनशील क्षेत्रामध्ये चीनच्या गुंतवणुकीवर निर्बंध घालू शकेल. तसा विचार सरकारी स्तरावर केला जात आहे, असे मत रानडे यांनी मांडले.

चीनच्या हालचालींची माहिती

पूर्व लडाखमध्ये चीनच्या हालचाली वाढल्याची माहिती एप्रिलमध्ये लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांना देण्यात आली होती. चीनने प्रत्यक्ष ताबारेषेनजीक बांधकाम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आधीपासूनच लष्कराने अधिक दक्ष राहायला हवे होते; पण आता या प्रसंगानंतर लष्कराचे डावपेच बदलतील, असा विश्वास रानडे यांनी व्यक्त केला.