भारतीय राजकारणात कोणाच्या मुलाने १०० कोटी कमावले, मुलीने ५०० कोटी तर कोणाच्या जावयाने हजार कोटी खाल्ले, असेच आजवर जनतेला ऐकायला मिळायचे पण आता परिस्थिती बदलली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर हल्ला चढवला. ते कॅलिफोर्नियातील सॅप सेंटर येथे उपस्थित अठरा हजार भारतीयांना संबोधित करताना बोलत होते.
राजकीय नेत्यांवर कोट्यवधींची माया जमावल्याचे आरोप आहेत. पण मझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ‘हम जियेंगे तो देश के लिये और मरेंगे तो भी देश के लिये’ असे म्हटले.
आपल्या देशात राजकीय नेत्यांवर काही वेळातचं आरोप लागायला सुरुवात होते. याने ५० कोटी तर त्याने १०० कोटी बनवले. कोणाच्या मुलाने १५० कोटी, मुलीने ५०० कोटी तर जावयाने १००० कोटी खाल्ले, असेच आजवर ऐकायला मिळायचे पण माझ्यावर अशा प्रकारचा कोणता आरोप आहे का? मी जगणार तर देशासाठी आणि मरणार तेसुद्धा देशासाठीचं, मोदींनी असे म्हणताचं मोदी.. मोदीचा जयघोष उपस्थितांनी सुरू केला. भारत आज सर्वात वेगाने आर्थिक वाढ होणारा देश असल्याचे सर्वांनी मान्य केले आहे, असेही मोदी म्हणाले.
कॅलिफॉर्नियात आल्यावर भारताची व्हायब्रंट छबी मला दिसली. आपल्या देशवासीयांनी संगणकावर बोटांनी कमाल करून भारताची एक नवी प्रतिमा तयार केली आहे. कॅलिफोर्नियामध्ये बसून तुम्ही संपूर्ण दुनियेतील लोकांना बदलण्यास भाग पाडता. हा बदल जो स्वीकारत नाही तो एकविसाव्या शतकात असंबद्ध ठरतो. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
‘ब्रेन ड्रेन’ म्हणून हिणवलं जाणा-या भारताची ओळख आज ‘ब्रेन गेन’ अशी झाली आहे. पण, ज्या पाण्याच्या, मातीच्या संस्कारांमुळे आपण इथपर्यंत पोहोचला आहात, ती माती तुमची वाट पाहत आहे. त्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. जयप्रकाश नारायण यांनी कॅलिफोर्नियात शिक्षण घेतले. गोपाल मुखर्जी हे १९४० मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर होणारे पहिले भारतीय होते. त्यामुळे कॅलिफोर्नियाशी भारताचे अतुट नाते आहे.
आज २१ वे शतक हे भारताचे असल्याचे जग मानू लागले आहे. हा बदल कसा आला? हा बदल मोदी कारणामुळे नाही तर, सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्प शक्तीमुळे आला आहे. सव्वाशे कोटी लोकांनी प्रतिज्ञा केली आहे आता देश मागे नाही राहणार. जेव्हा जनता संकल्प करते तेव्हा देवसुद्धा आशीर्वाद देतो. जगाचा हास्याचा विषय ठरलेला भारत आज जगासाठी केंद्रबिंदू आहे. आता वेळ बदलली असून, जगच भारताला जोडून घेण्यासाठी आसुसलेले दिसत आहे. हे विश्वासाचे वातावरण आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असेही ते पुढे म्हणाले.