अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला चीनने दर्शविलेला विरोध आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावाला खीळ घालण्याची चीनची कृती या विषयांवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या चीन भेटीत चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रणब मुखर्जी यांचे मंगळवारी ग्वांगझो शहरात आगमन झाले. गुरुवारी ते अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह अनेक उच्चपदस्थ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

राष्ट्रपती म्हणून मुखर्जी प्रथमच चीनला जाणार असले तरी यापूर्वी त्यांनी अनेकदा चीनचा दौरा केला आहे. उपरोक्त विषयांवर भारताची भूमिका ते मांडणार आहेत.

चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झांग देजियांग यांच्याशीही ते स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. वादग्रस्त सीमा प्रश्न आणि तो सोडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याबाबत मुखर्जी चीनच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

आण्विक प्रश्नावर भारताच्या भूमिकेला महत्त्व आहे, कारण पुढील महिन्यांत दक्षिण कोरियात ४८ देशांच्या अण्वस्त्र पुरवठादार गटाची बैठक होणार असून त्यामध्ये भारत सदस्यत्व मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

पाकिस्तानला सदस्यत्व मिळण्यास भारताचा विरोध नाही. पाकिस्तानची पाठराखण करण्यास चीन मोकळा आहे, मात्र भारताला शह देण्याचा प्रयत्न करू नये, असे सूत्रांनी सांगितले.