इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ‘राफेल’ फायटर विमानांनी रात्रीच्यावेळी उड्डाणाचा सराव सुरु केला आहे. हिमाचल प्रदेशच्या डोंगर रांगांमध्ये रात्रीच्या अंधारात ‘राफेल’ विमानांची गर्जना सुरु आहे. चीनला लागून असलेल्या १,५९७ किलोमीटरच्या लडाख सीमारेषेवर अजूनही तणावाची स्थिती आहे. उद्या परिस्थिती चिघळली तर लगेच प्रत्युत्तराची कारवाई करण्याच्या दृष्टीने राफेलने रात्रीचा युद्धसराव सुरु केलाय.

२९ जुलैला राफेलच्या पहिल्या तुकडीने भारतीय भूमीवर लँडिंग केले. पहिल्या तुकडीत पाच राफेल विमाने आहेत. अंबाला एअर बसेवर राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन तैनात असते. राफेलच्या दोन स्क्वाड्रन असणार आहेत. पहिली स्क्वाड्रन अंबाला बेसवर तर दुसरी भूतान जवळच्या हाशिमारा बेसवर तैनात असेल. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

टप्याटप्याने २०२२ पर्यंत भारताला ही फायटर विमाने मिळतील. अक्साई चीनमधील पीएलएच्या रडार्सना राफेलचे फ्रिक्वेन्सी सिग्नेचर मिळू नयेत, यासाठी नियंत्रण रेषेपासून सध्या या विमानांना लांब ठेवण्यात आले आहे. लडाख सेक्टरमध्ये प्रशिक्षणासाठी राफेल विमानांचा वापर करता येऊ शकतो असे हवाई तज्ज्ञांचे मत आहे. युद्धाच्या प्रसंगात सिग्नल फ्रिक्वेन्सी बदलण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे.

“चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अक्साई चीनमध्ये डोंगरात उंचावर सिग्नल पकडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स रडार्स बसवले आहेत. पण युद्धाच्या प्रसंगात राफेलचे सिग्नेचर दुसरे असतील. पीएलएचे एअर क्राफ्ट शोधण्यासाठी बनवलेले रडार्स चांगले आहेत. कारण त्यांनी अमेरिन एअर फोर्सला लक्षात ठेऊन ही रडार्स बनवली आहेत” असे तज्ज्ञांनी सांगितले.

राफेलमधली शस्त्रे त्याला सर्वाधिक घातक बनवतात. या फायटर विमानामध्ये हवेतून हवेत मारा करणारी मिटिओर, हवेतून जमिनीवरच्या लक्ष्याचा वेध घेणारी स्काल्प मिसाइल्स आहेत. मिटिओरची रेंज १५० किमी तर स्काल्पची रेंज ३०० किमी आहे. त्यामुळे राफेल शत्रूसाठी निश्चित कर्दनकाळ ठरेल.