हायस्पीड रेल्वे प्रकल्पांपासून चीनला दूर ठेवणे भारताच्या हिताचे नसल्याचा सल्ला चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिला आहे. ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलेल्या संपादकीयात भारताला हा सल्ला देण्यात आला आहे. भारताने संरक्षणवादी धोरण अवलंबू नये. नाहीतर त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होईल. त्याचबरोबर हायस्पीड रेल्वेमध्ये भारत हा खूप मागास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वास्तवात चीनला जितकी भारताची गरज आहे. त्याहून अधिक भारताला चीनची आवश्यकता आहे. विशेषत: स्टील उत्पादन आणि रेल्वे तंत्रज्ञानात चीन भारताची मदत करू शकतो, असे लेखात सांगितले आहे.
हायस्पीड रेल्वेसाठी भारताने आतापर्यंत चीनऐवजी जपानबरोबर हातमिळवणी करण्याचे धोरण राखले आहे. भारत जपानच्या मदतीने २०१८ च्या अखेरीपर्यंत पहिली हायस्पीड रेल्वे धावण्यासाठी प्रयत्नरत आहे. जर भारताला आपल्या रेल्वे यंत्रणेत मोठा बदल करायचा आहे. त्यांना हायस्पीड रेल्वेमध्ये खूप रस आहे. अशावेळी त्यांनी चीनप्रती जरा उदारपणा दाखवण्याची गरज आहे, असे वृत्तपत्रात म्हटले आहे.
जगातील रेल्वे नेटवर्कमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या भारताला सध्या पुरवठा संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: सरकारी स्टील कंपन्यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे खासगी कंपन्यांना त्यांना सोबत घ्यावे लागत आहे. चीनने मागील काही वर्षांत हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञान संपूर्ण जगात निर्यात करण्याचे काम केले आहे. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाल्याचे या लेखात म्हटले आहे.