रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल कमावला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून 1,536.85 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तिकिटे रद्द केल्यानंतर तिकिटातून कापल्या जाणाऱ्या रकमेत कपात करण्याचा रेल्वे विचार करत आहे का? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. अद्याप रेल्वेकडून यावर उत्तर मिळाले नाही.

मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी यासंदर्भात माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने निरनिराळ्या अर्जांअंतर्गत सदर माहिती दिल्याचे ते म्हणाले. अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर त्यातून रेल्वेला 1,518.62 कोटी रूपयांचा महसूल मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर अनारक्षित तिकिट प्रणालीच्या (यूटीएस) माध्यमातून बुक करण्यात आलेल्या तिकिटांना रद्द केल्यामुळे रेल्वेला 18.23 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापल्या जाणाऱ्या रकमेत काही कपात करणार आहे का? असा सवालही रेल्वेला केला असल्याचे गौड म्हणाले. तसेच आपल्याला अद्यापही यावर रेल्वेच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. तसेच आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापली जाणारी रक्कम कमी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.