‘रेलवे आपकी संपत्ति है…’ अशी घोषणा तुम्ही रेल्वे स्थानकांवर अनेकदा ऐकली असेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास काही लोकांनी ही घोषणा जास्तच गंभीरतेने घेतल्याचं दिसतंय. हे लोक रेल्वेकडून प्रवासादरम्यान सोयी सुविधेसाठी दिल्या जाणाऱ्या वस्तू चोरत असल्याचं समोर आलंय. हे चोरटे प्रवासी रेल्वेत देण्यात येणारे ब्लँकेट, चादर, उशी, चोरून नेत असल्याचे समोर आले आहे. या चिंधी चोरांनी तर चक्क रेल्वेच्या टॉयलेटमधील मग देखील चोरून नेले आहेत. अशा प्रवाशांमुळे रेल्वेला दर वर्षाला जवळपास एक हजार कोटींचा तोटा होत आहे. सोमवारी वांद्र्याहून रेल्वेत चढणाऱ्या रतलामच्या एका व्यक्तीला 3 ब्लॅंकेट, 6 चादर आणि 3 उशा चोरी करताना अटक करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 1.95 लाख टॉवेल लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून चोरण्यात आले आहेत. इतकंच नाही तर 81, 137 बेडशीट, 7,043 ब्लँकेट्स, 200 टॉयलेट मग, 1000 नळ आणि 300 पेक्षा जास्त फ्लश पाईप चोरण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2018 दरम्यान 79,350 टॉवेल, 27,545 चादर, 21,050 उशांचे कव्हर, 2,150 उशा आणि 2,065 ब्लॅंकेट चोरी झाले, जवळपास 62 लाख रुपये इतकी याची किंमत होती. यामुळे गेल्या तीन वर्षात रेल्वेला चार हजार कोटींचे नुकसान झाले आहे. चादर किंवा अशा अन्य वस्तूंची भरपाई कोच अटेंडंटला करावी लागते, तर बाथरूमच्या वस्तूंची भरपाई रेल्वेला करावी लागते. प्रत्येक बेडशीटची किंमत 132 रुपये, टॉवेलची किंमत 22 रुपये आणि उशीची किंमत 25 रुपये असते.

‘रेल्वे प्रवाशांचे हे वागणे अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. आम्ही प्रवाशांना उच्च श्रेणीच्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प्रवाशांनी देखील आम्हाला सहकार्य करायला हवे. सध्या आम्ही डिस्पोजेबल टॉवेल आणि उशांचे कव्हर द्यायला सुरुवात केली आहे’, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकर यांनी सांगितले.