सध्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण झाला. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. तसंच उद्योगधंदे बंद असल्यामुळे काही प्रवासी मजुरांनी पायी आपल्या मूळ गावाची वाट धरली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं मजुरांसाठी रेल्वे सेवा सुरू केली होती. श्रमिक रेल्वे गाड्यांमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही अनेक ठिकाणी रेल्वे गाड्याही उशिरा पोहोचत आहेत. ही योग्य वागणूक नाही, अशा आशयाचं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं. त्यावर रेल्वे प्रशासनानं ट्विट करत त्यांना तथ्य तपासून घेण्याची विनंती केली आहे.

“श्रमिक रेल्वेगाड्यांमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० टक्के ट्रेन उशिरानं धावत आहेत. अनेक ट्रेन दुसऱ्या ठिकाणीही पोहोचल्या आहेत. ही प्रवाशांना मिळणारी वागणूक योग्य नाही. या दरम्यान काही लोकांना रेल्वेनं प्रवास करू नका हे सांगण आश्चर्यकारक आहे. श्रमिकांसोबत अधिक संवेदनशीलतेनं वागणं आवश्यक आहे,” अशा आशयाचं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं.

आणखी वाचा- करोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं

यावर रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीदेखील ट्विटनं उत्तर दिलं आहे. “कृपया सर्वप्रथम तथ्य तपासून पाहा. श्रमिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे या सुपरफास्ट ट्रेनपेक्षाही अधिक वेगानं धावत आहेत. केवळ काही दिवसांसाठी एका सेक्शनवर अधिक ट्रेन असल्यामुळे काही रेल्वे गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. कोणत्याही रेल्वे गाड्या आपल्या मार्ग चुकल्या नव्हत्या,” असं रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.