भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ म्हणजे आयआरसीटीसी या संस्थेने रेल्वेच्या ई-तिकिटांवर  सेवा शुल्क १ सप्टेंबरपासून पुन्हा लागू केल्याने रेल्वे प्रवास महागणार आहे. हे सेवा शुल्क आयआरसीटीसी मार्फत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू राहील.

आयआरसीटीसीने नॉन एसी (वातानुकूलित नसलेल्या) वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर १५ रुपये तर एसी (वातानुकूलित) वर्गाच्या प्रत्येक तिकिटावर ३० रुपये सेवा शुल्क लागू केले आहे. याबाबतचा आदेश आयआरसीटीसीने ३० ऑगस्टला लागू केला होता. वस्तू व सेवा कर वेगळा लागू राहील. सेवा शुल्क हे तीन वर्षांपूर्वी डिजिटल पेमेंटला उत्तेजन देण्यासाठी रद्द करण्यात आले होते. त्या वेळी नॉन एसी तिकिटांवर प्रत्येकी २० रुपये तर एसी तिकिटांवर प्रत्येकी ४० रुपये शुल्क आकारले जात होते. या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळास (आयआरसीटीसी) सदर सेवा शुल्क पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली होती. ई-तिकिटांवर हे सेवा शुल्क लागू होणार असल्याने आता ही तिकिटे १ सप्टेंबरपासून महागणार आहेत. सेवा शुल्क पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव महामंडळाने मांडला होता. अर्थमंत्रालयाने ई-तिकिटांवरील सेवा शुल्क तात्पुरते माफ केले होते त्यामुळे ते पुन्हा सुरू करावे असाही युक्तिवाद करण्यात आला होता. सेवा शुल्क रद्द केल्याने आयआरसीटीसीचा इंटरनेट तिकीट महसूल २०१६-१७ या वर्षांत २६ टक्क्य़ांनी घटला होता.