करोना महामारीनंतर देशातील रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच रेल्वे प्रवासादरम्यान आता झोपून प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त भाडे आकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्येही तशाप्रकारचा दावा केला जातोय. यावर अखेर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेक :-
पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.

आणखी वाचा- भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या? रेल्वे मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

काय आहे सत्य ?-
“काही माध्यमांच्या वृत्तानुसार असा दावा केला जात आहे की, ट्रेनमध्ये झोपून प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे 10% अतिरिक्त भाडे आकारण्याची शक्यता आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे. अशाप्रकारची फक्त सूचना रेल्वे मंडळाला देण्यात आली होती. पण रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही”, असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे.


पीआयबीच्या स्पष्टीकरणामुळे रेल्वेतून झोपून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारण्याची कोणतीही योजना रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.