भारतीय रेल्वेने दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांकडे वक्रदृष्टी वळवली आहे. जे कर्मचारी दीर्घ काळापासून परवानगी न घेता अनुपस्थित आहेत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेने कोणत्याही सूचनेशिवाय कामावर येत नसलेल्या १३, ५०० कर्मचाऱ्यांना शोधून काढले आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाईही रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.

रेल्वे प्रशासनाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. रेल्वेची कामगिरी चांगली होण्यासाठी व निष्ठावान आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी एक अभियान सुरू केले आहे. ही कारवाई त्याचाच भाग असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

रेल्वेतील विविध विभागात दीर्घ कालावधीपासून अनाधिकृतपणे अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी एक व्यापक अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात रेल्वेला १३ लाख कर्मचाऱ्यांमधून १३,५०० असे कर्मचारी आढळून आले, जे कोणतीही सूचना न देता दीर्घ कालावधीपासून अनुपस्थित आहेत. त्यामुळे रेल्वेने अशा अनुपस्थित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यासाठी नियमानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली आहे. रेल्वेने सर्व अधिकारी आणि पर्यवेक्षकांना योग्य ती प्रक्रिया करून अशा कर्मचाऱ्यांचे नाव सूचीतून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.