आऊटसोर्सिग करण्याचा निर्णय

रेल्वे प्रवाशांना स्टेशनवर सामान ठेवण्यासाठीची असलेली खोली व लॉकर्स यांचे भाडे आता वाढवण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने विभागीय व्यवस्थापकांना स्थानकावरील सामानखोली व लॉकर्सचे भाडे वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या सेवेचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी लिलाव पद्धत वापरण्यात येणार आहे. दर वर्षांला या  सेवेचे भाडे वाढवण्यात येणार आहे. थोडक्यात लॉकर्स व सामानखोलीच्या सेवेचे आऊटसोर्सिग करण्यात येणार आहे.

सध्या रेल्वेच्या लॉकरचे भाडे २४ तासांना वीस रुपये असून ते अतिरिक्त २४ तासाला ३० रुपये आहे. याआधी ते १५ रुपये होते. सामानखोलीचे भाडे २४ तासांना १५ रुपये आहे ते इ.स. २००० मध्ये सात रुपये व अतिरिक्त चोवीस तासांना १० रुपये होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये या भाडय़ात सुधारणा करण्यात आली तेव्हा लॉकरचे भाडे चोवीस तासाला १० रुपये तर सामानखोलीचे भाडे १५ रुपये करण्यात आले होते. नवीन धोरण जाहीर झाल्यानंतर सामानखोली व लॉकर्सचे भाडे वाढणार आहे यासाठी खुली लिलाव पद्धत वापरण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लॉकर्स व सामानखोलीचे भाडे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पर्यटन स्थळाला भेट देणारे लोक सामान बरोबर न्यावे लागू नये म्हणून सामान घराचा व लॉकर्सचा उपयोग करतात. अनेकांना सामान सुरक्षित रहावे म्हणून ही सेवा हवी असते. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून ही सेवा दिली जात आहे. जेथे जास्त पर्यटक येतात तेथे अधिकाऱ्यांना भाडे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यात सामान कुलूपबंद करून संबंधितांच्या ताब्यात दिल्यानंतर पावती दिली जाते. नंतर सामान परत घेताना ही पावती दाखवून पैसे द्यावे लागतात. अनेक स्थानकावर सामानखोली किंवा लॉकर्समध्ये महिनाभर सामान व वस्तू ठेवता येतात. सध्या ए १ दर्जाच्या स्थानकावर परवाना फी घेऊन यशस्वी लिलावधारकाला ही सेवा चालवण्याची संधी दिली जाणार आहे. यात वर्षांला भाडय़ात वाढ करण्यात येणार आहे.